Sunday, 8 April 2012

'चिरगुट' : सारे काही 'नवक्रांती'साठी


Pictureसध्याचे देशातील सामाजिक तसेच राजकीय वातावरण इतके गढूळ झाले आहे कि, या वातावरणात कधी चांगला बदल होईल याचीच चिंता सर्वसामान्य व विचारी माणसाला लागून राहिली आहे. त्यामुळेच आण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी  आंदोलनाला युवकांचा देशभर उत्सफूर्त  पाठींबा मिळू शकला. निर्मात्या राजश्री जगताप आणि दिग्दर्शक प्रदीप घोन्सीकर यांच्या 'चिरगुट' या नवीन मराठी चित्रपटात झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न घेवून याच विषयाचा उहापोह करण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये प्रत्यक्ष घटना-प्रसंगापेक्षा भाषणबाजीवर  भर देण्यात आल्यामुळे केवळ एका आंदोलनात 'नवक्रांती' झालेली पहावयास मिळते. 'चिरगुट'  म्हणजे 'चिंधी' परंतु अश्या अनेक चिंध्या गोळा करून त्याची 'मशाल' करता येते हि दिग्दर्शकाची कल्पना चांगली आहे. 'चिंधी' सारखे आयुष्य जगणारा  सर्वसामान्य माणूस एकदा पेटून उठला कि, देशातील प्रस्थापित व्यवस्था तो बदलून टाकू शकतो हे आजपर्यंतच्या काही घटनावरून सिद्ध झाले आहे. त्याचाच आधार घेवून चित्रपटाची  कथा लिहिण्यात आली आहे. या चित्रपटाचा नायक नाग्या उर्फ नामदेव भंडारे  (उपेंद्र लिमये) हा झोपडपट्टीत राहणारा एक विद्रोही तरुण. अन्यायाविरुद्ध सतत पोटतिडीकीची भाषा बोलणारा व प्रस्थापितांना त्यांच्या तोंडावर विरोध करणारा. आपल्या तरुण मित्रांच्या सहकार्याने चळवळ उभारून ती यशस्वी करून दाखवितो. अर्थात त्याने यशस्वी केलेली हि चळवळ 'चमत्कार' वाटते  कारण चित्रपटात प्रत्यक्ष कृतीपेक्षा त्याची उठसूट भाषणबाजीच दिसून येते.
              उपेंद्र लिमये याने नाग्या च्या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. अन्यायाविरुद्ध  पोटतिडीकीची भाषा बोलणारा विद्रोही तरुण त्याने चांगला उभा केला आहे. चिन्मय मांडलेकर, सिया पाटील यांनी त्याला चांगली साथ दिली आहे. चित्रपटात 'राजकारण' हि आहे परंतु कथेच्या मानाने ते फार प्रभावी वाटत नाही. कनकराज यांनी संगीतबद्ध  केलेली गाणी विरंगुळा देणारी ठरली आहेत. मधु राव यांचे उत्कृष्ट छायाचित्रण हि या चित्रपटाची फार मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे चित्रपटातील 'नवक्रांती'  पाहायला सुसह्य झाली आहे.
                                                                                                                     ---- श्रीकांत ना. कुलकर्णी

'थोडी खट्टी, थोडी हट्टी....' , 'हलकीफुलकी कॉमेडी ..'


Picture'थोडी खट्टी, थोडी हट्टी....' या नावावरूनच हा चित्रपट ' कॉमेडी' असल्याचे कळून येते. त्याबाबतीत दिग्दर्शक सचिन वाघ यांनी मुळीच अपेक्षाभंग केलेला नाही, उलट या 'कॉमेडी' ला रहस्याची झालर जोडलेली आहे. मात्र ' हे रहस्य आणखी छान खुलविले असते तर ती एक मस्त 'गूढ कॉमेडी' झाली असती. परंतु ' कॉमेडी' ला प्राधान्य देण्याच्या नादात ' रहस्या'कडे थोडेसे दुर्लक्ष झाल्याने प्रेक्षकांना अतिशय  साध्या  हलक्याफुलक्या ' कॉमेडी' वरच समाधान मानावे लागते.
   चित्रपटाची कथा साधीच परंतु उत्कंठा वर्धक आहे. नायिका इरा देशमुख ( उर्मिला कानेटकर ) आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या बंगल्याच्या ताबा घ्यायला जाते. तिच्या वडिलांनी आणि त्यांचा प्रेयसीने हा बंगला बांधलेला असतो. मात्र इरा तेथे जाण्यापूर्वीच वडिलांच्या प्रेयसीचा मुलगा मिहीर  (उमेश कामत)  त्या बंगल्यात राहत असल्याचे तिला कळून येते. बंगल्याच्या मालकीवरून त्यांच्यात संघर्ष सुरु झालेला असताना 'छोटीशी लव्ह-स्टोरी'हि  सुरु होते. नंतर बंगल्यात एकेक 'गूढ' घटना घडू लागतात. या 'गूढ' घटना मधूनच नेमके सत्य  इरा देशमुख ला कळते. व ही 'छोटीशी लव्ह-स्टोरी' संपते.
    चित्रपटाच्या प्रारंभापासूनच छोट्या-छोट्या खेळकर प्रसंगातून दिग्दर्शकाने ' कॉमेडी' छान फुलवीत नेली आहे. मात्र  नंतर जेव्हा ' रहस्या' ला प्रारंभ होतो तेव्हा या ' रहस्या' बाबत साहजिकच उत्कंठा निर्माण होते. परंतु  ही उत्कंठता वाढविण्याच्या फंदात दिग्दर्शक फारसा पडलेला दिसत नाही त्यामुळे ' रहस्या' कडे दुर्लक्ष करून ' कॉमेडी' वरच समाधान मानावे लागते.
उर्मिला कानेटकर आणि उमेश कामत या जोडीने प्रथमच ' कॉमेडी' भूमिका करताना बऱ्याच अपेक्षा निर्माण केल्या आहेत.  श्रीनिवास भणगे यांच्या खुसखुशीत संवादाचा त्यात मोलाचा वाटा आहे. संगीतकार आशुतोष कुलकर्णी यांचे थोडी खट्टी, थोडी हट्टी....' हे एकमेव गाणे श्रवणीय आहे.
-- श्रीकांत ना. कुलकर्णी

'तीन बायका ..... 'मकरंद ला ऐका '


Pictureनिर्माते शंकर मिटकरी यांनी आपल्या 'साई शंकर फिल्म्स' संस्थेद्वारे केवळ मनोरंजनाच्या हेतूने  'तीन बायका फजिती ऐका ' हा नवा मराठी चित्रपट निर्माण केला असून तो चांगलीच करमणूक करून जातो. यापूर्वी ' दोन बायका फजिती ऐका ' तसेच 'पहिली शेर , दुसरी सव्वाशेर (आणि नवरा पावशेर..)' असे बायकाच्या वरचे चित्रपट येवून गेले आहेत. मात्र 'तीन बायका फजिती ऐका ' हा नवा मराठी चित्रपट आधुनिक काळाला साजेसा आहे. शिवाय तो मकरंद अनासपुरे या सध्याच्या आघाडीच्या विनोदी अभिनेत्याला डोळ्यासमोर ठेवूनच 'लिहिला' गेला असल्यामुळे व मकरंद अनासपुरे यानेही त्याचा पुरेपूर फायदा घेतल्यामुळे या चित्रपटातील त्याची (आणि त्याच्या बायकांची)  फजिती प्रेक्षकांची करमणूक करून देणारी ठरली आहे.
विश्वासराव डोके (मकरंद अनासपुरे) नावाचा श्रीमंत सावकार  पुत्र पहिली बायको (निशा परुळेकर) असताना देखील केवळ वंशाला दिवा पाहिजे म्हणून आपल्या आईच्या (सुरेखा कुडची) आग्रहास्तव ( व समाजसेवेचे कर्तव्य म्हणून ) दुसरी बायको  ( क्रांती रेडकर ) करतो. मात्र लग्नानंतर या सवती-सवतीचे चांगलेच मेतकुट जमते. त्यामुळे त्याच्या वाट्याला दोघीपैकी एकही येत नाही. त्यामुळे वैतागलेला विश्वासराव आपले 'डोके'  चालवून त्यांना धडा शिकविण्यासाठी  घरात आणखी एक तिसरी बायको ( तेजश्री खेळे) आणतो. मात्र हि तिसरी बायको फारच 'चालू' असते. शेवटी  सर्वजण एकत्र  येवून तिला 'धडा' शिकवितात व दोन बायकांचा 'दादला'  सुखाने संसार करतो.
 चित्रपटाच्या कथानकात तसे फार नाविन्य नाही अश्यावेळी संवाद हे बलस्थान ठरतात व संवाद लेखक अरविंद जगताप हे त्याबाबतीत यशस्वी ठरले आहेत असे म्हणावे लागेल. त्यांनी मकरंद अनासपुरेला डोळ्यासमोर ठेवूनच संवाद लिहिल्यामुळे व मकरंद अनासपुरे यानेही आपल्या देह्बोलीसकट 'मार्मिक' संवादफेक केल्यामुळे हि 'फजिती' खूपच सुसह्य झाली आहे.  त्याबाबतीत 'तीन बायका ..... 'मकरंद ला ऐका ' असेच म्हणावे लागेल. क्रांती रेडकर हिनेही आगळीवेगळी विनोदी भूमिका करून चांगलीच 'रंगत' आणली आहे. निशा परुळेकर, सुरेखा कुडची, तेजश्री खेळे आणि पदार्पणातच खलनायकाची भूमिका करणारा वरद चव्हाण यांचीही कामे ठीक झाली आहेत. प्रमुख आकर्षण म्हणून चित्रपटात घुसडलेले 'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्याने  मात्रं म्हणावी तशी करमणूक होत नाही.
   थोडक्यात मकरंद अनासपुरेला 'ऐकण्यासाठी' व 'पाहण्यासाठी' या तीन बायकांची 'फजिती' जरूर पहा.
                                                                                                                   -- श्रीकांत ना. कुलकर्णी

'चिनु' : एका आदिवासी तरुणीची 'संघर्षपूर्ण' कथा


Pictureशिवलीला फिल्म्स' निर्मित 'चिनु' या नवीन मराठी चित्रपटात 'चिनु' नावाच्या एका आदिवासी तरुणीची 'संघर्षपूर्ण' कथा चित्रित करण्यात आली आहे. आदिवासी पाड्यावर राहणारी  परंतु शहराचे आकर्षण असणारी 'चिनु'  ( तेजस्विनी लोणारी ) आपल्या भावी जीवनाबद्दल खूपच स्वप्नाळू  असते. म्हणूनच प्रथेप्रमाणे पाड्यावरील इतर तरुणीप्रमाणे ती होळी पौर्णिमेला आपला 'जोडीदार' निवडत नाही. त्यामुळे तिच्या आईला काळजी वाटते. 'चिनु' ला शहरात राहणारा मात्र आपल्या आईची तसेच आजारी भावाची काळजी घेणारा 'जोडीदार' हवा असतो.
'संपत'  ( प्रवीण तरडे ) हा गावचाच परंतु शहरात राहून वाईट धंदे करणारा तरुण 'चिनु' च्या सौंदर्यावर मोहित होऊन तिला लग्नाची मागणी घालतो. त्यासाठी तिच्या अटीही मान्य करतो. आपल्याला शहरात जायला मिळणार या आनंदात 'चिनु' त्याच्याशी लग्न करते मात्र शहरात गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात येते. परंतु वाईट धंद्यात राहूनही 'चिनु' ला पाहून आपली विवेकबुद्धी जागी ठेवणारा ' राझ' ( शरद केळकर ) हा तरुण 'चिनु' च्या प्रेमात पडतो व तिची सुटका करण्याचे ठरवितो. त्यातून झालेल्या संघर्षात 'संपत' कडून ' राझ' मारला जातो मात्र शेवटी 'चिनु' 'संपत'ला ठार करून त्याचा बदला घेते.
       निर्मात्या व दिग्दर्शिका नीलिमा लोणारी यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. कथा नाट्यपूर्ण असली तरी पटकथेत  काही प्रमुख व्यक्तिरेखा आणखी 'विकसित' करण्याची गरज होती. त्यामुळे चित्रपटात  महत्वाच्या त्रुटी जाणवतात. असे असले तरी मध्यंतरापूर्वी  आदिवासी पाड्यावरचे 'निसर्गसौंदर्य' व मध्यंतरानंतरचा  उत्कंठा वाढविणारा  'संघर्ष' यामुळे चित्रपट खूपच सुसह्य झाला आहे. छायालेखक समीर आठल्ये यांचा त्यामध्ये मोलाचा वाटा आहे. संगीतकार अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेली प्रकाश होळकर यांची गाणीही श्रवणीय आहेत.तेजस्विनी लोणारी हिने 'चिनु' ची भूमिका प्रभावीपणे वठविली आहे.  प्रवीण तरडे,  शरद केळकर तसेच संदीप पाठक यांच्याही भूमिका लक्षणीय ठरल्या आहेत.
थोडक्यात  'चिनु' चांगली करमणूक  करून जाते.
                                                                                                          --- श्रीकांत ना. कुलकर्णी

इट्स 'मैंटर' ऑफ ओन्ली 'गुंडाराज'


Pictureमराठीत सध्या नाविन्यपूर्ण विषयावर चित्रपटाची निर्मिती होत असताना गुन्हेगारीचा विषय त्याला अपवाद राहिलेला नाही. सारथी ग्रुपच्या  'मैंटर' या नव्या मराठी चित्रपटात मुंबईतील गुन्हेगारी विश्वावर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. मात्र हिंदी चित्रपटाच्या तोडीस तोड करण्याच्या नादात मूळ चित्रपटाची कथाच हरवून गेल्यामुळे चित्रपट म्हणजे  इट्स 'मैंटर' ऑफ ओन्ली 'गुंडाराज' असाच झाला आहे.
    'पक्या', 'बाब्या', 'राजा' आणि 'रॉनी' ( अनुक्रमे - संतोष जुवेकर, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, व राजेश शृंगारपुरे ) या चार गुन्हेगार मित्रांची  कथा दाखविताना छायालेखक व दिग्दर्शक सतीश मोतलिंग यांनी कथेपेक्षा अक्शनवर जास्त भर दिल्याने चित्रपटातील  अनेक प्रसंग छायालेखनाच्या दृष्टीने सरस ठरत असले तरी ते कथाहीन असल्यामुळे प्रभावहीन वाटतात. मुंबईतील गुन्हेगारी विश्व दाखविताना चित्रपटात  अनेक व्यक्तिरेखा आल्याच मात्र एकही व्यक्तिरेखा 'विकसित' करण्यात आलेली नाही. 'सुलभाताई'  (उषा नाडकर्णी ) यांच्यासारख्या राजकारणातील व्यक्तींचे नेमके हेतू  असतात तरी कोणते तेही स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे चित्रपटात व्यक्तिरेखांची केवळ सरमिसळ पाहायला मिळते. पोलीस आयुक्तांची  हत्या ( तेही वृत्तपत्रातील बातमीवरून) झाल्याचे कळल्यानंतरच ती व्यक्ति पोलीस आयुक्त होती हे कळते. तसेच पटकथेकडे दुर्लक्ष्य झाल्यामुळे नेमके कोणाचे 'खून' पडतात हेही लवकर कळत नाही. त्याचप्रमाणे शेवटी चकमकीत 'पक्या', 'बाब्या' व 'रॉनी'मारले जातात. मात्र  सुरुवातीस  'राजा' मृत झाल्याचे भासवून नंतर त्याला जिवंत ठेवण्याचे ( तो बंकौक मध्ये असल्याचे दाखवून ) प्रयोजन लक्षात येत नाही. चित्रपटात आयटम सौंग बरोबरच इतर भरपूर समूह नृत्य गीते आहेत मात्र ती चित्रपटाची लांबी वाढविण्यास मदत करतात एवढेच. संतोष जुवेकर, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, व राजेश शृंगारपुरे यांनी आपल्या भूमिका चांगल्या रंगविल्या आहेत. इन्स्पेकटर झालेल्या समीर धर्माधिकारी याला मात्र फारसे काम नाही. थोडक्यात भरपूर हिंसाचार आणि 'गुंडाराज' पाहायचे असल्यास हा 'मैंटर' अवश्य पहा.
                                                                                                         ---- श्रीकांत ना. कुलकर्णी

'पुलं' कित झालेली ' गोळाबेरीज'


Pictureमहाराष्ट्राचे ' लाडकं व्यक्तिमत्व ' म्हणून जनमानसात सुपरिचित असलेल्या पुलं देशपांडे  यांच्या विनोदी साहित्याचे गारूड अजूनही मराठी जनतेवर आहे. त्यांना भेटलेल्या 'व्यक्ती आणि वल्ली',  त्यांचे 'गणगोत' यांच्यावर रसिकांनी भरभरून प्रेम केले. त्यांच्या अशा काही अस्सल नमुन्याची ' गोळाबेरीज' करून ती मोठ्या पडद्यावर आणण्याचा एक चांगला प्रयत्न निर्माते देवदत्त कपाडिया व दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांनी ' गोळाबेरीज' या नव्या चित्रपटातून केला आहे. पुलं देशपांडे यांच्या लेखन प्रवासातून त्यांना भेटत गेलेल्या या इरसाल व्यक्तिरेखा एकामागून एक अश्या पडद्यावर येत राहतात आणि ज्यांना या 'व्यक्तिरेखा' आधीच माहित आसतात त्यांना पुन: प्रत्ययाचा आनंद मिळतो. या 'व्यक्तिरेखाचे गुण-आवगुण  पुलं देशपांडे यांच्याच शब्दात मांडल्यामुळे हा आनंद होताना प्रसंगी हास्याचे  फवारे बाहेर पडतात. अर्थात पुलं देशपांडे यांचा लेखन प्रवास  एवढीच या चित्रपटाची कथा-मर्यादा आसल्यामुळे त्यांना भेटलेल्या 'व्यक्तिरेखांची' हि जंत्री आहे असे काहीजणांना वाटू शकते. मात्र  या  'व्यक्तिरेखांसाठी' अभिनेते किंवा अभिनेत्रीची केलेली निवड परिपूर्ण आहे असेच म्हणावे लागेल.. त्याबद्दल दिग्दर्शकाला शंभर मार्क दिलेच पाहिजेत.
दिलीप प्रभावळकर (अंतू  बर्वा ), अभिजीत सावंत ( गदिमा), सतीश शहा ( पेसत्नजी), मोहन आगाशे ( चितळे मास्तर), सुबोध भावे (नंदा प्रधान), भार्गवी चिरमुले ( इंदू वेलणकर), प्रशांत दामले ( कुलकर्णी), संजय नार्वेकर ( बबडू ) आदी 'व्यक्तिरेखा' चांगल्याच लक्षात राहतात. सर्वात मुख्य म्हणजे पुलंच्या भूमिकेत निखील रत्नपारखी आणि सुनिताबाईंच्या भूमिकेत नेहा देशपांडे  (हि पुलंचीच नात आहे ) हि जोडी छान शोभून दिसली आहे. अर्थात सुनिताबाईंचा पुलंच्या व्यक्तिमत्वावर असलेला प्रभाव चित्रपटात पाहिजे  तेवढा स्पष्ट दिसत नाही. चित्रपटात 'इंद्रायणी काठी'. 'इथेच टाका तंबू '  'नाच रे मोरां ' हि पुलं चीच जुनी गाणी नव्या स्वरुपात सादर करण्यात  आलेली आहेत. व ती श्रवणीय ठरली आहेत. थोडक्यात, पुलं प्रेमीना हि ' गोळाबेरीज' नक्कीच आनंद देणारी आहे.

                                                                                                                         --  श्रीकांत ना. कुलकर्णी

' कॉपी' परीक्षेत पास झालेला 'संभा'


Picture' कॉपी' म्हणजे नक्कल हल्ली सर्वच क्षेत्रात पहावयास मिळते. चित्रपट क्षेत्रात तर ती हमखास असतेच. म्हणजे ' बौली वूड्ने'  'हौलीवूड'ची ' कॉपी करायची तर बौलीवूडची किंवा 'तौलीवूडची  ' इतर प्रादेशिक भाषातील चित्रपटांनी नक्कल करायची. नुकताच प्रदर्शित झालेला  'संभा' ...  आजचा छावा  हा नवा मराठी चित्रपट हा त्याचेच एक उदाहरण म्हणावे लागेल. या चित्रपटात दाक्षिणात्य  चित्रपटातील हाणामारीच्या स्टाईलची ' कॉपी' टू ' कॉपी' करण्यात आली आहे. अर्थात हि ' कॉपी' फक्त हाणामारी व गाणी यांच्यापुरतीच मर्यादित आहे. चित्रपटाचा मूळ गाभा असलेली कथा मात्र टिपिकल मराठी वळणाची आहे. त्यामुळे हा चित्रपट फक्त मारधाड अक्शन पुरताच मर्यादित बनला आहे.
निर्माते देवेंद्र चौगुले यांनी या चित्रपटाची निर्मिती करताना त्यातील 'संभा' या मुख्य नायकाची भूमिकाही साकारली आहे. पीळदार शरीरयष्टीचा 'संभा' आपल्या हिमतीच्या आणि ताकदीच्या जोरावर भ्रष्टाचारी
लोकाविरुद्ध एकाकी लढा देवून त्यांना वठणीवर आणतो अशी या चित्रपटाची कथा आहे. मात्र पटकथेची मांडणी विस्कळीत झाल्यामुळे हाणामारी व गाणी एवढेच या  चित्रपटाचे आकर्षण उरते. त्याच्याबाबतीच्या अपेक्षा मात्र पूर्ण होतात. एरवी  टिपिकल कथानकामुळे काही प्रसंगही ' टिपिकल' वाटतात. मोहन जोशी ( भ्रष्ट व्यापारी ), मिलिंद गुणाजी ( भ्रष्ट आमदार ) यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने कामे केली आहेत. दिपाली सय्यद ( महिला पत्रकार) , तेजश्री खेळे यांना मात्र तसे फार काम नाही. 'संभा' झालेले देवेंद्र चौगुले हे फक्त मारामारीच्या प्रसंगात शोभतात.
स्टंट मास्टर आनंदराज यांची साहस दृष्ये तसेच नृत्य दिग्दर्शक कलाधरण यांची गाण्यातील नृत्ये  (आणि गाणीही ) चांगली करमणूक करतात. तेच या चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरले आहे. त्यादृष्टीने पाहता दाक्षिणात्य चित्रपटाच्या  ' कॉपी'  परीक्षेत हा 'संभा' चांगल्या गुणांनी  पास झालेला आहे असे म्हणावे लागेल.
                                                                                                --  श्रीकांत ना. कुलकर्णी