अभिनेता अंकुश चौधरी याने दिग्दर्शित केलेला 'झकास' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित होऊन गेला. त्यामध्ये त्याने दोन -तीन व्यक्तीरेखाची 'सोंगे' छान वठविली होती . त्याच्या नव्या 'ब्लफ मास्टर' या चित्रपटातही एका स्त्री- पात्रासह त्याने वठविलेली 'सोंगे' हेच चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. चित्रपटाची कथा म्हणजे एक 'फार्स' आहे. जो यापूर्वी अनेक नाटकाप्रमाणे अनेक चित्रपटातही पहावयास मिळाला आहे. त्यामुळे कथेत फारशी गोडी नसली तरी नायकाने वठविलेली 'सोंगे' चांगली गोडी निर्माण करतात व एक चांगला 'फार्स' पाहिल्याचे समाधान मिळते. अर्थात त्याला बऱ्याच शाब्दिक व प्रासंगिक विनोदाची फोडणी मिळाली आहे.चित्रपट उद्योगात नाव कमाविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या 'निकी' ( अंकुश चौधरी ), प्रकाश ( मंगेश देसाई ), व दीपक ( पुष्कर श्रोत्री ) या तीन मित्रांची हि कथा आहे. सानिकावर (तेजस्विनी पंडित) 'निकी' व दीपक या दोघांचेही प्रेम आहे. मात्र सानिकाचे प्रेम मिळविण्यासाठी 'निकी' ला आपल्या वडिलांचे त्याचबरोबर त्यांच्या बहिणीचे म्हणजे आत्याचे 'सोंग' वठवावे लागते. काहीवेळा एकाचवेळी हि 'सोंगे' वठवावी लागतात त्यामुळे त्याची चांगलीच त्रेधातिरपीट उडते. व त्यातून चांगला गोधळ निर्माण होतो. या गोंधळाला सुरुवातीपासूनच रहस्याची जोड देण्यात आलेली आहे मात्र शेवटी हे रहस्य कुचकामी ठरल्याचे दिसून येते. 'निकी', त्याचे वडील व आत्या या तिन्ही भूमिकांमध्ये अंकुश चौधरीला चांगला वाव आहे. व त्याने या भूमिकांना चांगला न्याय दिला आहे. पुष्कर श्रोत्री व मंगेश देसाई व किशोरी अंबिये हेही काही प्रसंगात मजा आणतात. मात्र जयवंत वाडकर व त्याच्या गुंड मित्रांची झालेली फजिती हि ओढून-ताणून केल्यासारखी वाटते. संगीतकार प्रसाद-अद्वैत यांनी संगीतबद्ध केलेले 'रॉक अन्ड पॉप ' स्टायील शीर्षक गीत ( आठवा अभिषेक बच्चनचा 'ब्लफ मास्टर' हा हिंदी चित्रपट ) हे या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे. थोडक्यात हा 'ब्लफ मास्टर' चांगली करमणूक करून देतो.
---- श्रीकांत ना. कुलकर्णी
No comments:
Post a Comment