Sunday, 8 April 2012

'पुलं' कित झालेली ' गोळाबेरीज'


Pictureमहाराष्ट्राचे ' लाडकं व्यक्तिमत्व ' म्हणून जनमानसात सुपरिचित असलेल्या पुलं देशपांडे  यांच्या विनोदी साहित्याचे गारूड अजूनही मराठी जनतेवर आहे. त्यांना भेटलेल्या 'व्यक्ती आणि वल्ली',  त्यांचे 'गणगोत' यांच्यावर रसिकांनी भरभरून प्रेम केले. त्यांच्या अशा काही अस्सल नमुन्याची ' गोळाबेरीज' करून ती मोठ्या पडद्यावर आणण्याचा एक चांगला प्रयत्न निर्माते देवदत्त कपाडिया व दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांनी ' गोळाबेरीज' या नव्या चित्रपटातून केला आहे. पुलं देशपांडे यांच्या लेखन प्रवासातून त्यांना भेटत गेलेल्या या इरसाल व्यक्तिरेखा एकामागून एक अश्या पडद्यावर येत राहतात आणि ज्यांना या 'व्यक्तिरेखा' आधीच माहित आसतात त्यांना पुन: प्रत्ययाचा आनंद मिळतो. या 'व्यक्तिरेखाचे गुण-आवगुण  पुलं देशपांडे यांच्याच शब्दात मांडल्यामुळे हा आनंद होताना प्रसंगी हास्याचे  फवारे बाहेर पडतात. अर्थात पुलं देशपांडे यांचा लेखन प्रवास  एवढीच या चित्रपटाची कथा-मर्यादा आसल्यामुळे त्यांना भेटलेल्या 'व्यक्तिरेखांची' हि जंत्री आहे असे काहीजणांना वाटू शकते. मात्र  या  'व्यक्तिरेखांसाठी' अभिनेते किंवा अभिनेत्रीची केलेली निवड परिपूर्ण आहे असेच म्हणावे लागेल.. त्याबद्दल दिग्दर्शकाला शंभर मार्क दिलेच पाहिजेत.
दिलीप प्रभावळकर (अंतू  बर्वा ), अभिजीत सावंत ( गदिमा), सतीश शहा ( पेसत्नजी), मोहन आगाशे ( चितळे मास्तर), सुबोध भावे (नंदा प्रधान), भार्गवी चिरमुले ( इंदू वेलणकर), प्रशांत दामले ( कुलकर्णी), संजय नार्वेकर ( बबडू ) आदी 'व्यक्तिरेखा' चांगल्याच लक्षात राहतात. सर्वात मुख्य म्हणजे पुलंच्या भूमिकेत निखील रत्नपारखी आणि सुनिताबाईंच्या भूमिकेत नेहा देशपांडे  (हि पुलंचीच नात आहे ) हि जोडी छान शोभून दिसली आहे. अर्थात सुनिताबाईंचा पुलंच्या व्यक्तिमत्वावर असलेला प्रभाव चित्रपटात पाहिजे  तेवढा स्पष्ट दिसत नाही. चित्रपटात 'इंद्रायणी काठी'. 'इथेच टाका तंबू '  'नाच रे मोरां ' हि पुलं चीच जुनी गाणी नव्या स्वरुपात सादर करण्यात  आलेली आहेत. व ती श्रवणीय ठरली आहेत. थोडक्यात, पुलं प्रेमीना हि ' गोळाबेरीज' नक्कीच आनंद देणारी आहे.

                                                                                                                         --  श्रीकांत ना. कुलकर्णी

No comments:

Post a Comment