शिवलीला फिल्म्स' निर्मित 'चिनु' या नवीन मराठी चित्रपटात 'चिनु' नावाच्या एका आदिवासी तरुणीची 'संघर्षपूर्ण' कथा चित्रित करण्यात आली आहे. आदिवासी पाड्यावर राहणारी परंतु शहराचे आकर्षण असणारी 'चिनु' ( तेजस्विनी लोणारी ) आपल्या भावी जीवनाबद्दल खूपच स्वप्नाळू असते. म्हणूनच प्रथेप्रमाणे पाड्यावरील इतर तरुणीप्रमाणे ती होळी पौर्णिमेला आपला 'जोडीदार' निवडत नाही. त्यामुळे तिच्या आईला काळजी वाटते. 'चिनु' ला शहरात राहणारा मात्र आपल्या आईची तसेच आजारी भावाची काळजी घेणारा 'जोडीदार' हवा असतो.'संपत' ( प्रवीण तरडे ) हा गावचाच परंतु शहरात राहून वाईट धंदे करणारा तरुण 'चिनु' च्या सौंदर्यावर मोहित होऊन तिला लग्नाची मागणी घालतो. त्यासाठी तिच्या अटीही मान्य करतो. आपल्याला शहरात जायला मिळणार या आनंदात 'चिनु' त्याच्याशी लग्न करते मात्र शहरात गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात येते. परंतु वाईट धंद्यात राहूनही 'चिनु' ला पाहून आपली विवेकबुद्धी जागी ठेवणारा ' राझ' ( शरद केळकर ) हा तरुण 'चिनु' च्या प्रेमात पडतो व तिची सुटका करण्याचे ठरवितो. त्यातून झालेल्या संघर्षात 'संपत' कडून ' राझ' मारला जातो मात्र शेवटी 'चिनु' 'संपत'ला ठार करून त्याचा बदला घेते.
निर्मात्या व दिग्दर्शिका नीलिमा लोणारी यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. कथा नाट्यपूर्ण असली तरी पटकथेत काही प्रमुख व्यक्तिरेखा आणखी 'विकसित' करण्याची गरज होती. त्यामुळे चित्रपटात महत्वाच्या त्रुटी जाणवतात. असे असले तरी मध्यंतरापूर्वी आदिवासी पाड्यावरचे 'निसर्गसौंदर्य' व मध्यंतरानंतरचा उत्कंठा वाढविणारा 'संघर्ष' यामुळे चित्रपट खूपच सुसह्य झाला आहे. छायालेखक समीर आठल्ये यांचा त्यामध्ये मोलाचा वाटा आहे. संगीतकार अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेली प्रकाश होळकर यांची गाणीही श्रवणीय आहेत.तेजस्विनी लोणारी हिने 'चिनु' ची भूमिका प्रभावीपणे वठविली आहे. प्रवीण तरडे, शरद केळकर तसेच संदीप पाठक यांच्याही भूमिका लक्षणीय ठरल्या आहेत.
थोडक्यात 'चिनु' चांगली करमणूक करून जाते.
--- श्रीकांत ना. कुलकर्णी
No comments:
Post a Comment