' कॉपी' म्हणजे नक्कल हल्ली सर्वच क्षेत्रात पहावयास मिळते. चित्रपट क्षेत्रात तर ती हमखास असतेच. म्हणजे ' बौली वूड्ने' 'हौलीवूड'ची ' कॉपी करायची तर बौलीवूडची किंवा 'तौलीवूडची ' इतर प्रादेशिक भाषातील चित्रपटांनी नक्कल करायची. नुकताच प्रदर्शित झालेला 'संभा' ... आजचा छावा हा नवा मराठी चित्रपट हा त्याचेच एक उदाहरण म्हणावे लागेल. या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटातील हाणामारीच्या स्टाईलची ' कॉपी' टू ' कॉपी' करण्यात आली आहे. अर्थात हि ' कॉपी' फक्त हाणामारी व गाणी यांच्यापुरतीच मर्यादित आहे. चित्रपटाचा मूळ गाभा असलेली कथा मात्र टिपिकल मराठी वळणाची आहे. त्यामुळे हा चित्रपट फक्त मारधाड अक्शन पुरताच मर्यादित बनला आहे.निर्माते देवेंद्र चौगुले यांनी या चित्रपटाची निर्मिती करताना त्यातील 'संभा' या मुख्य नायकाची भूमिकाही साकारली आहे. पीळदार शरीरयष्टीचा 'संभा' आपल्या हिमतीच्या आणि ताकदीच्या जोरावर भ्रष्टाचारी
लोकाविरुद्ध एकाकी लढा देवून त्यांना वठणीवर आणतो अशी या चित्रपटाची कथा आहे. मात्र पटकथेची मांडणी विस्कळीत झाल्यामुळे हाणामारी व गाणी एवढेच या चित्रपटाचे आकर्षण उरते. त्याच्याबाबतीच्या अपेक्षा मात्र पूर्ण होतात. एरवी टिपिकल कथानकामुळे काही प्रसंगही ' टिपिकल' वाटतात. मोहन जोशी ( भ्रष्ट व्यापारी ), मिलिंद गुणाजी ( भ्रष्ट आमदार ) यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने कामे केली आहेत. दिपाली सय्यद ( महिला पत्रकार) , तेजश्री खेळे यांना मात्र तसे फार काम नाही. 'संभा' झालेले देवेंद्र चौगुले हे फक्त मारामारीच्या प्रसंगात शोभतात.
स्टंट मास्टर आनंदराज यांची साहस दृष्ये तसेच नृत्य दिग्दर्शक कलाधरण यांची गाण्यातील नृत्ये (आणि गाणीही ) चांगली करमणूक करतात. तेच या चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरले आहे. त्यादृष्टीने पाहता दाक्षिणात्य चित्रपटाच्या ' कॉपी' परीक्षेत हा 'संभा' चांगल्या गुणांनी पास झालेला आहे असे म्हणावे लागेल.
-- श्रीकांत ना. कुलकर्णी
No comments:
Post a Comment