Sunday, 8 April 2012

खास तरुणाईची सप्तरंगी करमणूक


Picture सध्या अनेक विविध विषयावर मराठी चित्रपट निघत आहेत. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी 'उलाढाल' नंतर 'सतरंगी रे ' हा नावातच सप्तरंगी असणारा चित्रपट निर्माण केला असून तो खरोखरच खास तरुणाईची सप्तरंगी करमणूक करणारा ठरला आहे. या चित्रपटाने तरुण मराठी प्रेक्षकाला चांगली भुरळ घालण्याचा प्रयत्न  केला  आहे.   'सतरंगी रे ' मध्ये संगीतावर मनापासून प्रेम करणाऱ्या व स्वताचा 'रॉक- ब्यांड ' असलेल्या चार तरुण मित्रांची कथा सांगण्यात आलेली आहे. रेगो उर्फ गोरक्ष म्हापसेकर ( आदिनाथ कोठारे ) , मायकेल उर्फ येझदी ( सिद्धार्थ चांदेकर ), जयदीप कामत  उर्फ जेडी ( भूषण प्रधान) , आणि निखील उर्फ निक (सौमित्र शृंगारपुरे ) हे चौघे जिवलग मित्र  एकाच अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी. मात्र  अभ्यासापेक्षा त्यांचे संगीतावर म्हणजेच आपल्या 'रॉक- ब्यांड ' वर खास प्रेम. परंतु  त्यांच्या प्रत्येकाच्या घरच्यांची म्हणजेच पालकांची त्यांच्याकडून वेगळीच अपेक्षा असते. नाईलाजानेच ते सर्वजण पालकांच्या अपेक्षा पूर्ण  करायला निघतात मात्र त्यात कोणाचेच मन रमत नाही. आणि नंतर एक अशी घटना घडते कि, त्यांच्या पालकानाही आपली चूक कळून येते. आणि ते त्यांना त्यांच्या मार्गाने ( संगीताच्या करिअरकडे ) जाण्याचे स्वात्र्यंत देतात .  पालकांच्या वाढत्या अपेक्ष्यामुळे तरुण मनाची होणारी घुसमट या चित्रपटात संगीताच्या आधारे प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. 'रॉक- ब्यांड ' असल्यामुळे काही प्रमुख गाणी 'रॉक '  स्टायील असली व ती चित्रपटापुरती चांगली वाटत असली तरी ती लक्षात राहत नाहीत. जेनी (पूजा पवार) आणि आलीशा (अमृता खानविलकर ) या अनुक्रमे जेडी व रेगो यांच्या प्रेयशी. मात्र त्यांच्या व्यक्तिरेखा आणखी विकसित करण्याची गरज होती. चित्रपटाचा शेवटही खूपच लांबविण्यात आला आहे. मात्र  एकूणच उतक्रष्ट छायाचित्रण आणि संगीत यामुळे   'सतरंगी रे ' हि खास तरुणाईची सप्तरंगी करमणूक ठरली आहे. 


                                                                                   --  श्रीकांत ना. कुलकर्णी

No comments:

Post a Comment