'थोडी खट्टी, थोडी हट्टी....' या नावावरूनच हा चित्रपट ' कॉमेडी' असल्याचे कळून येते. त्याबाबतीत दिग्दर्शक सचिन वाघ यांनी मुळीच अपेक्षाभंग केलेला नाही, उलट या 'कॉमेडी' ला रहस्याची झालर जोडलेली आहे. मात्र ' हे रहस्य आणखी छान खुलविले असते तर ती एक मस्त 'गूढ कॉमेडी' झाली असती. परंतु ' कॉमेडी' ला प्राधान्य देण्याच्या नादात ' रहस्या'कडे थोडेसे दुर्लक्ष झाल्याने प्रेक्षकांना अतिशय साध्या हलक्याफुलक्या ' कॉमेडी' वरच समाधान मानावे लागते.चित्रपटाची कथा साधीच परंतु उत्कंठा वर्धक आहे. नायिका इरा देशमुख ( उर्मिला कानेटकर ) आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या बंगल्याच्या ताबा घ्यायला जाते. तिच्या वडिलांनी आणि त्यांचा प्रेयसीने हा बंगला बांधलेला असतो. मात्र इरा तेथे जाण्यापूर्वीच वडिलांच्या प्रेयसीचा मुलगा मिहीर (उमेश कामत) त्या बंगल्यात राहत असल्याचे तिला कळून येते. बंगल्याच्या मालकीवरून त्यांच्यात संघर्ष सुरु झालेला असताना 'छोटीशी लव्ह-स्टोरी'हि सुरु होते. नंतर बंगल्यात एकेक 'गूढ' घटना घडू लागतात. या 'गूढ' घटना मधूनच नेमके सत्य इरा देशमुख ला कळते. व ही 'छोटीशी लव्ह-स्टोरी' संपते.
चित्रपटाच्या प्रारंभापासूनच छोट्या-छोट्या खेळकर प्रसंगातून दिग्दर्शकाने ' कॉमेडी' छान फुलवीत नेली आहे. मात्र नंतर जेव्हा ' रहस्या' ला प्रारंभ होतो तेव्हा या ' रहस्या' बाबत साहजिकच उत्कंठा निर्माण होते. परंतु ही उत्कंठता वाढविण्याच्या फंदात दिग्दर्शक फारसा पडलेला दिसत नाही त्यामुळे ' रहस्या' कडे दुर्लक्ष करून ' कॉमेडी' वरच समाधान मानावे लागते.
उर्मिला कानेटकर आणि उमेश कामत या जोडीने प्रथमच ' कॉमेडी' भूमिका करताना बऱ्याच अपेक्षा निर्माण केल्या आहेत. श्रीनिवास भणगे यांच्या खुसखुशीत संवादाचा त्यात मोलाचा वाटा आहे. संगीतकार आशुतोष कुलकर्णी यांचे थोडी खट्टी, थोडी हट्टी....' हे एकमेव गाणे श्रवणीय आहे.
-- श्रीकांत ना. कुलकर्णी
No comments:
Post a Comment