निर्माते शंकर मिटकरी यांनी आपल्या 'साई शंकर फिल्म्स' संस्थेद्वारे केवळ मनोरंजनाच्या हेतूने 'तीन बायका फजिती ऐका ' हा नवा मराठी चित्रपट निर्माण केला असून तो चांगलीच करमणूक करून जातो. यापूर्वी ' दोन बायका फजिती ऐका ' तसेच 'पहिली शेर , दुसरी सव्वाशेर (आणि नवरा पावशेर..)' असे बायकाच्या वरचे चित्रपट येवून गेले आहेत. मात्र 'तीन बायका फजिती ऐका ' हा नवा मराठी चित्रपट आधुनिक काळाला साजेसा आहे. शिवाय तो मकरंद अनासपुरे या सध्याच्या आघाडीच्या विनोदी अभिनेत्याला डोळ्यासमोर ठेवूनच 'लिहिला' गेला असल्यामुळे व मकरंद अनासपुरे यानेही त्याचा पुरेपूर फायदा घेतल्यामुळे या चित्रपटातील त्याची (आणि त्याच्या बायकांची) फजिती प्रेक्षकांची करमणूक करून देणारी ठरली आहे.विश्वासराव डोके (मकरंद अनासपुरे) नावाचा श्रीमंत सावकार पुत्र पहिली बायको (निशा परुळेकर) असताना देखील केवळ वंशाला दिवा पाहिजे म्हणून आपल्या आईच्या (सुरेखा कुडची) आग्रहास्तव ( व समाजसेवेचे कर्तव्य म्हणून ) दुसरी बायको ( क्रांती रेडकर ) करतो. मात्र लग्नानंतर या सवती-सवतीचे चांगलेच मेतकुट जमते. त्यामुळे त्याच्या वाट्याला दोघीपैकी एकही येत नाही. त्यामुळे वैतागलेला विश्वासराव आपले 'डोके' चालवून त्यांना धडा शिकविण्यासाठी घरात आणखी एक तिसरी बायको ( तेजश्री खेळे) आणतो. मात्र हि तिसरी बायको फारच 'चालू' असते. शेवटी सर्वजण एकत्र येवून तिला 'धडा' शिकवितात व दोन बायकांचा 'दादला' सुखाने संसार करतो.
चित्रपटाच्या कथानकात तसे फार नाविन्य नाही अश्यावेळी संवाद हे बलस्थान ठरतात व संवाद लेखक अरविंद जगताप हे त्याबाबतीत यशस्वी ठरले आहेत असे म्हणावे लागेल. त्यांनी मकरंद अनासपुरेला डोळ्यासमोर ठेवूनच संवाद लिहिल्यामुळे व मकरंद अनासपुरे यानेही आपल्या देह्बोलीसकट 'मार्मिक' संवादफेक केल्यामुळे हि 'फजिती' खूपच सुसह्य झाली आहे. त्याबाबतीत 'तीन बायका ..... 'मकरंद ला ऐका ' असेच म्हणावे लागेल. क्रांती रेडकर हिनेही आगळीवेगळी विनोदी भूमिका करून चांगलीच 'रंगत' आणली आहे. निशा परुळेकर, सुरेखा कुडची, तेजश्री खेळे आणि पदार्पणातच खलनायकाची भूमिका करणारा वरद चव्हाण यांचीही कामे ठीक झाली आहेत. प्रमुख आकर्षण म्हणून चित्रपटात घुसडलेले 'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्याने मात्रं म्हणावी तशी करमणूक होत नाही.
थोडक्यात मकरंद अनासपुरेला 'ऐकण्यासाठी' व 'पाहण्यासाठी' या तीन बायकांची 'फजिती' जरूर पहा.
-- श्रीकांत ना. कुलकर्णी
No comments:
Post a Comment