मराठीत सध्या नाविन्यपूर्ण विषयावर चित्रपटाची निर्मिती होत असताना गुन्हेगारीचा विषय त्याला अपवाद राहिलेला नाही. सारथी ग्रुपच्या 'मैंटर' या नव्या मराठी चित्रपटात मुंबईतील गुन्हेगारी विश्वावर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. मात्र हिंदी चित्रपटाच्या तोडीस तोड करण्याच्या नादात मूळ चित्रपटाची कथाच हरवून गेल्यामुळे चित्रपट म्हणजे इट्स 'मैंटर' ऑफ ओन्ली 'गुंडाराज' असाच झाला आहे.'पक्या', 'बाब्या', 'राजा' आणि 'रॉनी' ( अनुक्रमे - संतोष जुवेकर, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, व राजेश शृंगारपुरे ) या चार गुन्हेगार मित्रांची कथा दाखविताना छायालेखक व दिग्दर्शक सतीश मोतलिंग यांनी कथेपेक्षा अक्शनवर जास्त भर दिल्याने चित्रपटातील अनेक प्रसंग छायालेखनाच्या दृष्टीने सरस ठरत असले तरी ते कथाहीन असल्यामुळे प्रभावहीन वाटतात. मुंबईतील गुन्हेगारी विश्व दाखविताना चित्रपटात अनेक व्यक्तिरेखा आल्याच मात्र एकही व्यक्तिरेखा 'विकसित' करण्यात आलेली नाही. 'सुलभाताई' (उषा नाडकर्णी ) यांच्यासारख्या राजकारणातील व्यक्तींचे नेमके हेतू असतात तरी कोणते तेही स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे चित्रपटात व्यक्तिरेखांची केवळ सरमिसळ पाहायला मिळते. पोलीस आयुक्तांची हत्या ( तेही वृत्तपत्रातील बातमीवरून) झाल्याचे कळल्यानंतरच ती व्यक्ति पोलीस आयुक्त होती हे कळते. तसेच पटकथेकडे दुर्लक्ष्य झाल्यामुळे नेमके कोणाचे 'खून' पडतात हेही लवकर कळत नाही. त्याचप्रमाणे शेवटी चकमकीत 'पक्या', 'बाब्या' व 'रॉनी'मारले जातात. मात्र सुरुवातीस 'राजा' मृत झाल्याचे भासवून नंतर त्याला जिवंत ठेवण्याचे ( तो बंकौक मध्ये असल्याचे दाखवून ) प्रयोजन लक्षात येत नाही. चित्रपटात आयटम सौंग बरोबरच इतर भरपूर समूह नृत्य गीते आहेत मात्र ती चित्रपटाची लांबी वाढविण्यास मदत करतात एवढेच. संतोष जुवेकर, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, व राजेश शृंगारपुरे यांनी आपल्या भूमिका चांगल्या रंगविल्या आहेत. इन्स्पेकटर झालेल्या समीर धर्माधिकारी याला मात्र फारसे काम नाही. थोडक्यात भरपूर हिंसाचार आणि 'गुंडाराज' पाहायचे असल्यास हा 'मैंटर' अवश्य पहा.
---- श्रीकांत ना. कुलकर्णी
No comments:
Post a Comment